१४ राजकन्या
नाव जरा वेगळंच वाटते आहे न ' १४ राजकन्या' . मागच्याच आठवड्यात लेकीसोबत लहान मुलांची नाटक बघण्याचा योग आला. त्यावेळीस पहिलेल हे नाटक १४ राजकन्या. खूपच आवडलं. समोर बसलेल्या नवीन पिढीला त्यांच्या संस्कारक्षम मनाला एक चांगला विचार देण्याची ताकद होती या छोट्या नाटुकल्यात......
सारे जहासे अच्छा हिंदोस्ता हमारा
हम बुलबुले हैं इसकी ये गुलसिता हमारा
या गाण्याने नाटिकेची सुरुवात झाली. सारे जहासे अच्छा असा विविध परंपरानी नटलेला नानाविध संस्कृती एकत्र नांदणारा भौगोलिक दृष्ट्या सक्षम असलेला असा भारत देश... या आपल्या भारत देशात वेगवेगळे प्रांत आहेत . प्रत्येकाची संस्कृती,तिथे साजरे केले जाणारे सण वेगळे तिथे बोलली जाणारी भाषा वेगळी. तर एकूण १४ प्रांतांचे आणि तिथल्या भाषांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या अशा त्या १४ राजकन्या. प्रत्येकीने थोडक्यात पण समर्पकपणे त्या भाषेची माहिती सांगितली अर्थात मुलांना आवडेल अशा नृत्य आणि गाण्याच्या माध्यमातून.
नंतर सुरु झाली त्या १४ राजकन्यातील भांडणे. सगळ्याच स्वतःला श्रेष्ठ म्हणवून स्वतःचे गुण गाण्यात रमलेल्या. मग भले तामिळी आणि केरळी बाजूबाजूला आहेत पण एकमेकींचा मोठेपणा मान्य करून घ्यायला कोणीच तयार होत नव्हते. तशातच प्रश्न आला तो म्हणजे राष्ट्रभाषेचा सन्मान कोणाला देण्यात यावा? अशी भाषा जी जास्त बोलली जाते जी आपल्या राष्ट्राचे प्रतिनिधित्व करू शकेल.त्यावेळी एक आजी प्रवेश घेते हि प्रतिनिधत्व करते सर्वच भाषांची जननी असलेल्या 'संस्कृत' भाषेचे .संस्कृत साहित्यात सर्व विषयावरील ज्ञानाचे अपार भांडार आहे.भारतीय संस्कृतीचा पायादेखील हे संस्कृत साहित्यच आहे . हि संस्कृत रुपी आजीच मग या सगळ्या भाषांना एकत्र आणायचा प्रयत्न करू पाहते.अखेर सर्वानुमते ठरते खरे कि तो मान हिंदी भाषेला देण्यात यावा. पण आपापसात या राजकन्या ची धुसफूस चालूच राहते .
अशातच प्रवेश करते ती जागतिक दृष्ट्या अत्यंत सक्षम समजली गेलेली आणि वर्चस्व स्थापन केलेली 'इंग्रजी' भाषा . हि राजकन्या येते काय आणि सगळ्या लोकांचे लक्ष वेधून घेते काय. तिचा प्रभाव वाढू लागतो आणि लवकरच तो राष्ट्रभाषेचा मुकुट ती हिरावून घेऊ लागते. बाकीच्या १४ राजकन्या निमुटपणे पडून राहतात. करतील काय?? लोकांनीच त्यांची अशी अवस्था करून टाकलेली असते, नवीन पिढी फक्त आणि फक्त या दिमाखात राजमान झालेल्या इंग्रजीची गुलाम झालेली असते.आपल्या मुलाला एकवेळ स्वतःची मातृभाषा आली नाही तरी चालेल परंतु इंग्रजी तर यावयासच हवी. इंग्रजीतून संभाषण करणारा तो 'Most sophisticated ' आणि मातृभाषेतून संवाद करणारा मात्र 'ill mannered '. आपल्याच प्रांतात आपलीच गळचेपी या भाषा फक्त सहन करत राहतात. सांगणार कोणास? या भाषांना संजीवनी कोण देणार ? एवढ्यात एक चिमुकला जवान तिथे येतो आणि त्या भाषांना सजीव करतो .
परक्या भाषेला आपलेसे करून ती भाषा अंगीकारणे हि सन्मानाची गोष्ट आहे पण आपल्या मातृभाषेला विसरून दुसरी भाषा स्वीकारणे हि शरमेची बाब आहे.
परक्या भाषेला आपलेसे करून ती भाषा अंगीकारणे हि सन्मानाची गोष्ट आहे पण आपल्या मातृभाषेला विसरून दुसरी भाषा स्वीकारणे हि शरमेची बाब आहे.
किती छान संदेश दिला आहे या नाटकातून. आपल्याला पुढे जायचे असेल , खूप प्रगती करायची असेल तर ज्या भाषेत भरपूर माहिती उपलब्ध आहे जी भाषा जागतिक स्तरावर स्वीकारली गेली आहे अशा इंग्रजी भाषेमध्ये आपले प्रभुत्व निश्चितच सिध्द केले पाहिजे . पण त्याच वेळीस आपल्या मातृभाषेला विसरता कामा नये. आजच्या पिढीला हे कळणे अत्यंत जरुरीचे आहे.
ICSE आणि CBSE शाळामधून मराठी हा विषय आता optional केला गेला आहे. अशा वेळीस पोट धरून हसायला लावणाऱ्या पुलंच्या मार्मिक कोटया,हिरवे हिरवे गार गालिचे कवितेतून दाखवणाऱ्या बालकवींच्या कविता,शिवाजी महाराजांचे चरित्र उलगडून दाखवणारे श्रीमान योगी, पाडगावकर, अत्रे, चि.वि, खांडेकर,शांता शेळके मुलांपर्यंत न गेले तर याला जबाबदार कोण??? अर्थात पालकच.बोलायला लागल्यापासून ज्या स्वाभाविक भाषेत आपल्या विचारांचा विकास होतो ती भाषा कायम धरून ठेवायला आपणच मुलांना शिकवलं पाहिजे .
नाटक संपताना मुलांना एक प्रश्न विचारला गेला . 'मुलानो तुम्हाला मराठी भाषा आवडते कि नाही ?' मुलांनी एवढा तगडा होकार भरला त्यावरूनच लक्षात येत कि या भाषा हे फक्त मध्यम आहे विचार मांडण्याच .
हे नक्की मनाशी ठरवायला हव, शिक्षणाच्या क्षेत्रात इंग्रजीवर प्रभुत्व मिळवत असताना आपल्या मातृभाषेला विसरता कामा नये.
हे नक्की मनाशी ठरवायला हव, शिक्षणाच्या क्षेत्रात इंग्रजीवर प्रभुत्व मिळवत असताना आपल्या मातृभाषेला विसरता कामा नये.
मुलांना त्यांच्या मातृभाषेपासून अलग न करता त्याचीच कास धरून स्वतःची आणि पर्यायाने राष्ट्राची उन्नती साधा असे सांगणारा नाटकाचा हा प्रयोग खूपच स्तुत्य आहे. यासाठी त्याचे दिगदर्शक 'राजू तुलालवार' यांचे कौतुक केले पाहिजे. मुलांना समजतील आणि त्यांना कळतील अशा मनोरंजक माध्यमातून सादर केली जाणारी त्यांची नाटके उल्लेखनीय .मुले पोट धरून हसतात,उत्स्फूर्त दाद देतात आणि परत जाताना सोबत एक विचार घेऊन जातात.
0 Comments:
Post a Comment
Subscribe to Post Comments [Atom]
<< Home