Tuesday, 20 March 2012

किल्ले शिवनेरी...एक सुखद अनुभव

Sport shoes,rugsack,cap,sunglasses,torch.....तयारी झाली एकदाची.. कसली म्हणून काय विचारता ??? ट्रेकची.... खूप दिवसापासून इच्छा होती असा एखादा ग्रुप जोडावा पण रोजच्या कामात आणि अधिकाधिक व्यस्त होत चाललेल्या दिनक्रमात ट्रेकिंग वगैरे  काही जुळून येत नव्हत खर... बऱ्याचदा कस होत आपल्याला इच्छा खूप असते फिरण्याची , नवीन काहीतरी अनुभवण्याची पण असा एखादा ग्रुप मिळण बर त्या ग्रुपमधले लोक आपल्याला समाविष्ट करून घेतील कि नाही सारेच अनुत्तरीत ... मग त्याच उत्तर शोधलं या गुगलवर .... आणि दोघांनी मिळून  ठरवलं कि आपल्या ट्रेकिंगची मुहूर्तमेढ रोवायचीच!!!!!


"प्रौढ प्रताप पुरंदर,  क्षत्रिय कुलावतंस,  गोब्राह्मण प्रतिपालक,  सिंहासनाधीश्वर,  महाराजाधिराज          छ्त्रपति
शिवाजी महाराज की जय!"

 हा जय जेव्हा हृदयातून शब्दावाटे बाहेर पडतो न तेव्हा एक वेगळ्या प्रकारच चैतन्य येत. उर प्रचंड अभिमानाने भरून येतो.मराठी साम्राज्याचे संस्थापक, "हे राज्य व्हावे हि तर श्रींची इच्छा" या वेड्या ध्येयापायी तत्कालीन आदिलशाही,निजामशाही आणि मुघलशाहीशी बाणेदारपणे लढलेले शिवाजी महाराज,वयाच्या अवघ्या १६व्या वर्षी स्वराज्याची शपथ घेऊन जनतेवरील अन्याय आणि अत्याचाराला वाचा फोडणारे आदर्श शासनकर्ते  छत्रपती शिवाजी महाराज......अशा या महान राजाचा जन्म ज्या शिवनेरी गडावर झाला तिथून आमच्या ट्रेकिंगची सुरुवात झाली हा एक सुरेख योगायोगच म्हणावा लागेल....
सुरुवातीला जरा धाकधूक होती प्रवास कसा असेल आपल्याला जमेल कि नाही पण प्रवास सुरु झाला तशा नवीन ओळखी झाल्या , आपल्यासारखीच भरपूर चालण्याची आवड असलेली ,शिवाजी महाराज,महाराष्ट्र यावर मनापासून प्रेम करणारी माणस  भेटली. आणि शिवनेरीवर मार्गक्रमण सुरु झाल....या ऐतिहासिक स्थळाचे महत्व त्यामागची कथा , शिवाजी महाराजांचा अख्खा इतिहास सगळ सगळ माहिती होत. शिवाजी सावंत यांनी लिहिलेलं महाराजांवरच 'श्रीमान योगी' तर कित्येकदा वाचलेलं तरीही प्रत्यक्ष तिथे जाऊन तिथला इतिहास ट्रेकलीडरकडून ऐकताना परत सगळ काही नव्यानेच कळतंय  अस वाटल...
पूर्ण प्रवासात सगळ्यात आवडलेला आणि कायम आठवणीत राहील असा क्षण म्हणजे गडावर जिथे महाराजाचा जन्म झाला तिथे आम्ही  सर्व जण काही वेळ शांत बसलो होतो कसलाही आवाज न करता .. तोच म्हणावा लागेल.... केवढी शांतता होती त्या क्षणात. मी तर चक्क डोळे बंद केले होते. मुंबईतल्या रोजच्या त्या गर्दी , गोंधळापासून दूर असा एक वेगळाच शांतपणा, ट्रेक लीडर सांगत होते कानावर पडत होत पण मन खूप शांत होत.. सर्वांनी एकत्र म्हटलेला ऑम तर निव्वळ अप्रतिम.... एकट्या  शिवाजी महाराजांनी त्यांच्या निवडक साथीदारांसह स्वराज्य स्थापन करण्याची हिम्मत दाखवली.. आज आपण प्रत्येकाने ठरवलं एकत्र येऊन काहीतरी चांगल काम करायचं तर  बरच  काही करता येण्यासारखं आहे. आदर्श ठेवायचा तो महाराजांचा,प्रेरणा घ्यायची ती त्यांच्या जीवनकार्यातून आणि 'मंगल देशा पवित्र देशा दगडांच्या देशा ' असलेल्या अशा आपल्या महाराष्ट्राची आणि पर्यायाने भारताची शान वाढेल अस काहीतरी कराव प्रत्येकाने ठरवावं ....
आजच जग खूपच धावपळीच आहे.. आपण बघतो लोक अत्याधुनिक सुखाच्या , चैनीच्या आणि पर्यायाने लागणाऱ्या  पैशासाठी नुसते धावत असतात.आपणही त्यातलेच .. काहींची गरज असते काहींची आवड असते..काहीना या देशाचाच कंटाळा आलेला असतो त्या सर्वांच्या दृष्टीने ते बरोबर असतीलही पण .. पण .... या गर्दी, प्रदूषण , महागाई आणि न जाणो अजून बरयाच गोष्टींनी नाडल्या गेलेल्या देशात राहून ढासळणाऱ्या किल्ल्यांच्या भग्न अवशेषाकडून प्रेरणा घेणारी त्यांच्या डागडुजीसाठी जवळचा पैसा आणि वेळ खर्च करणारी , लोकांचे ग्रुप बनवून त्यांना परवडेल अशा माफक दरांत या किल्ल्यांचे दर्शन घडवणारी त्यांच्याबद्दल अभिमान जागृत करणारी देखील काही लोक आहेत हे ही  नसे थोडके!!!!!!!!
mumbaitraveller  च्या पूर्ण टीमचे मनापासून   अभिनंदन आणि आभार.. शिस्तबद्ध आणि सर्वानाच सामावून घेतील असे छान खेळीमेळीचे वातावरण असलेला छानसा ग्रुप . परत फिरून यावे असे वाटायला लावणारा .... तुमच्या पुढील सर्व ट्रेकसाठी खूप शुभेच्छा...