राधेय मृत्युंजय आणि हॅरी पॉटर
परवा रविवाराच्या लोक्रंग पुरवणी मधे मृत्युंजयचे मन्त्र भारले दिवस असा लेख वाचण्यात आला.
मृत्युंजय कादंबरी साधारण १९६७ साली प्रकाशित झाली . २०१६ हे या कादंबरीचं सुवर्णमहोत्सवी वर्ष. त्या संदर्भात हा लेख आला होता. लेख वाचला आणि कित्येक जुन्या स्मृतींना उजाळा मिळाला .
साधारण आठवी आणि नववीच्या सुट्यामध्ये मी सगळी प्रसिद्ध पुस्तक वाचून काढण्याचा सपाटाच लावला होता हे पक्के आठवत आहे.
मराठी माध्यमाच्या शाळेत शिकत असल्यामुळे शालेय जीवनात मी मराठी वाचन जास्त केलं. शब्दांच्या त्या राज्यात रमायला मला खूप आवडायचं. ऐतिहासिक कादंबऱ्याचे तर वेड लागले होते. स्वामी , श्रीमान योगी, छावा अशा कित्येक कादंबऱ्या तेव्हा सलग वाचून काढल्या होत्या.
विशेषतः उदात्त आणि विशाल हृदयी , दानशूर अशा अलौकिक व्यक्तिमत्वाची कर्णाची अविस्मरणीय कथा सांगणारी राधेय आणि मृत्युंजय तर जास्त आवडीची झाली होती. मी राधेय आधी वाचल कि मृत्युंजय ते काही आठवत नाही पण वस्तुतः सूर्यपुत्र असलेल्या आणि कायम सूतपुत्र म्हणून अवहेलना सहन केलेल्या अंगराज कर्णाला केंद्रस्थानी ठेवून लिहिलेल्या या दोन्ही कादंबऱ्यांनी मनाचा पूर्ण ताबा घेतला होता . परत परत पुस्तक आणून मी त्या कादंबऱ्या वाचल्या होत्या.
कर्णावर झालेला अन्याय त्या वेळी खूप असह्य व्हायचा एवढा मोठा योद्धा असून कर्ण कायमच उपेक्षित राहिला याच खूप वाईट वाटायचं . पुस्तकातली पानं च्या पानं तेव्हा तोंडपाठ झाली होती.
त्या वयात कर्णाची झालेली अवहेलना खुपली आणि परत परत वाचाविशी वाटली.
आता तुम्ही म्हणाल राधेय , मृत्युंजय मध्ये तर कर्णाचा धागा समान आहे मग आता हा तिसरा हॅरी पॉटर यांच्या रांगेत का बरे बसवला आहे. तीनही पुस्तकातला समान धागा आहे भारावून टाकण्याचा . मृत्युंजय राधेय या कथांना महाभारतातील कथेचा आधार होता आणि या हॅरी पॉटर नामक fiction रुपी झंझावाताला तसा वास्तवाचा आधार काहीच नाही .
कल्पनेच्या जगात स्वैर मुशाफिरी करणारा ,जादूचे प्रशिक्षण घेणारा, आपल्या साहसाने व कौशल्याने दुष्ट जादूगाराशी लढा देणाऱ्या या हॅरी पॉटर नावाच्या कथानायकाने आणि अकल्पित तसेच चित्तथरारक घटनांनी खिळवून ठेवणाऱ्या या पुस्तकाने वाचकांना भारावून टाकले आहे.
ज्या वयात मी राधेय श्रीमान योगी हि पुस्तके वाचली त्या पेक्षा कमी वयाची असताना आज माझी मुलगी आता या हॅरी पॉटर ची पारायणे करते आहे.
खरंतर या हॅरी पॉटर बद्दल मला काही फारशी माहिती नव्हती. तिला वाचायची आवड होती त्यामुळे आम्ही तिला काही महिन्यांपूर्वी हॅरी पॉटर चे एक पुस्तक बक्षीस म्हणून दिले
त्यानंतर तिने त्याची पुस्तके वाचायचा सपाटाच लावला आहे.
हि पुस्तके खूप मोठी आणि महाग देखील आहेत. त्यामुळे आम्ही तिला एक target देत आलो आहोत. अमुक एक गोष्ट केलीस तर नवीन पुस्तक . पण पुस्तक आणून द्यायचा अवकाश ती ते कधी वाचते वाचून कधी संपवते तीच तिलाच माहिती . लगेच पुढच्या पुस्तकाची मागणी झालेली असते.
मला तर या पुस्तकाच्या लेखिकेची कमाल वाटते इ स १९९० साली मँचेस्टर ते लंडन या रेल्वेप्रवासात तिला या मालिकेची कल्पना स्फुरल्याचे म्हटले जाते.
हॅरी पॉटर चा सातवा भाग २००९मध्ये आला होता त्यानंतर त्याचा आठवा भाग आता २०१६ मध्ये आला आहे . तब्बल ९ वर्षाच्या गॅप नंतर झालेल्या त्याच्या एन्ट्री चे लोकांनीही भरभरून स्वागत केले आहे
काळ बदलला ,कर्ण इतिहासजमा झाला आणि हॅरी पॉटर आला . ऐतिहासिक वास्तवदर्शी कादंबऱ्या जाऊन काल्पनिक कादंबऱ्या आल्या .आईचे मराठी वाचन मागे पडून मुलीचे इंग्रजी वाचन सुरु झाले. फक्त एक गोष्ट बदलली नाही आणि ती म्हणजे वाचनाची आवड.
रणजित देसाई , पु ल देशपांडे शिवाजी सावंत यांच्यासारखे वाचकांना भारावून सोडतील असे मराठी लेखक आता उरले नाहीत . मनावर खोल ठसा उमटवणारी मराठी पुस्तके देखील फारशी लिहिली जात नाहीत . त्या पुस्तकांची जागा आता आकर्षक वेष्टनातल्या इंग्रजी पुस्तकांनी घेतली आहे . पण भारावून टाकणारा तो धागा मात्र तसाच आहे.
तहान भूक विसरून , क्वचित कधी अभ्यासाचा पसारा मागे सारून पलंगावर उलटे उताणे झोपून पुस्तकामध्ये एकटक तंद्री लावलेल्या माझ्या मुलीला बघितले कि मला खूप छान वाटते.मला काही वर्षांपूर्वीची मी आठवते. ती बरेच वेळा मला पुस्तकातल्या आश्चर्यकारक गोष्टी सांगण्याचा प्रयत्न करत असते.मी फक्त हसते मनातल्या मनात सुखावते . आई बाबानी माझ्यावर केलेले वाचन संस्कार , चांगल्या गोष्टी बघण्याची लिहिण्याची निर्माण केलेली आवड जेव्हा तिच्यामध्ये देखील दिसून येते तेव्हा एक वर्तुळ पूर्ण झाल्यासारखे वाटते.
आह्मां घरीं धन शब्दाचींच रत्नें ।
शब्दाचींच शस्त्रें यत्ने करूं
शब्दचि आमुच्या जीवाचें जीवन ।
शब्दें वांटूं धन जनलोकां
अजूनही मी मॅजेस्टिक मध्ये जाऊन दोन तीन महिन्यातून एकदा पुस्तके खरेदी करत असते. मराठी सोबत इंग्लिश पुस्तके देखील बरीच वाचते पण काळ वेळ विसरून अधाशासारखी पुस्तके आता वाचली जात नाहीत. त्याच काही वैषम्य देखील वाटत नाही. पण त्याच बरोबर नवीन पिढीत हे वाचनाचे वेड वेगळ्या स्वरूपात का असेना पण शिल्लक आहे हे हि नसे थोडके!!!!!!
0 Comments:
Post a Comment
Subscribe to Post Comments [Atom]
<< Home