Friday 26 July 2013

असाही एक दिवस !!!!!

            पुन्हा एकदा मस्त गावे ,झुलावे ,रुसावे ,हसावे किती वाटते
             उतरून ओझे वयाचे चला रे पहा कोवळे ऊन बोलावते …

दर शुक्रवारी झी मराठीवर प्रसारित होणारया 'मधलीसुट्टी' या कार्यक्रमाच्या सुरुवातीला लागणारे हे गाणे. प्रत्येक भागात आपली शाळा असेल का हि उत्सुकता तर असायचीच पण किंबहुना त्याहीपेक्षा जास्त तिथल्या बाकावर बसून सार काही आठवण्याची आणि बरचस परत नव्याने अनुभवण्याची संधी आपल्याला मिळाली तर….

मनातल्या इच्छा मनातल्या मनात …
माझी शाळा… किती हळुवार कप्पा असतो न आपल्या आयुष्यातला. नुसत्या त्या विचाराने मनात एक हलकेसे मोरपीस फिरवल्यासारखे वाटत. शाळेतले दिवस आपण कधीच विसरू शकत नाही. कितीही मोठ्ठे झालो तरी.




पण हि संधी मला मिळाली . यासाठी खरतर धन्यवाद द्यायला हवेत ते सर्व जग जवळ आणणाऱ्या अशा सर्वव्यापी संकल्पनेचे । इंटरनेटचे !!!! इंटरनेटच्या फेसबुकरुपी  दूताने (हो दूतच तो सगळ्या दूर दूर पांगलेल्या लोकांना संदेश पोचवणारा)  हि किमया घडवून आणली. आणि शाळेचा असा एक ग्रुप तयार झाला संपर्क वाढत गेला आणि सगळ्यांनी भेटायचे असे ठरले तेही शाळेच्याच आवारात…. जे या इंटरनेटच्या माध्यमाशी जोडलेले नाहीत अशा सर्वाना फोन केले गेले. ज्यांची घर माहिती होती त्यांना प्रत्यक्ष  घरी जाऊन या कार्यक्रमाची माहिती देण्यात आली.
 दिवस ठरला वेळ ठरली. 

जवळ जवळ २० वर्षांनी शाळेत जायचं तर त्या शाळारुपी आईला काहीतरी  घेऊन जायला नको का???
ज्या शाळेने आपल बोट धरून आपल्याला बाकावर बसवलं आपल्याला लिहित केल,ज्ञात केल जिच्या पुण्याईने आपण एवढे मोठे झालो ,कर्तबगार झालो तिला भेटायचे. ती नकोच म्हणेल कदचित. पण आम्ही तिला एक projector द्यायचे ठरवले. 

९ जून २०१३ । रविवारची प्रसन्न सकाळ . आजचा दिवस काही वेगळा होता खास..मधल्या सरल्या वर्षांचे पूल ओलांडून आज सारे शाळेत जमणार होते. खुप छान वाटत होत. नक्की शब्दात सांगता येण कठीण आहे . 
माझ्या बाकावर बसणाऱ्या ,ज्यांच्यासोबत सुख दुःखाच्या कित्येक गोष्टी मी वाटल्या त्या दोघी जणी काही कारणामुळे येऊ शकणार नव्हत्या. त्यामुळे मन जरा  उदास होते पण शाळेत परत जाण्याचा त्या वास्तूला जवळून बघण्याचा  तिथल्या भिंती,फळे ,जिथे  आम्ही अभ्यास केला ते वर्ग पुन्हा एकदा  अनुभवण्याचा जो काही आनंद मिळणार होता त्या आनंदाने या उदासीवर मात केली आणि मी जायचं ठरवलं. 

हा सगळा कार्यक्रम ज्यांनी ठरवला तो प्रत्यक्षात यावा म्हणून आपापल्या व्यस्त दिनक्रमातून वेळ काढून त्यासाठी मेहनत घेतली त्या सर्वांचे कौतुक शब्दात मांडणे कठीण आहे. कारण मंडप बांधण्यापासून ते सर्व शिक्षिकांना आमंत्रण पत्रिका देणे ,  त्यांच्या सत्काराची तयारी, प्रोजेक्टरची खरेदी ,catering एक न अनेक किती गोष्टी…. 

शाळा अजिबात बदलली नव्हती. आम्ही जशी सोडून गेलो होतो अगदी तशीच होती . मला  आठवतो आहे निरोपसमारंभाचा तो कार्यक्रम. प्रवीण दवण्यांनी काय सुरेख भाषण केले त्यावेळीस. आत्तापर्यंत घट्ट बांधलेले आम्हा  मैत्रिणींचे  हात आता सुटणार होते. शाळेच्या सुरक्षित भिंतीतून बाहेर पडण्याची एक उत्सुकता होती ,भीती होती पण वाईट देखील तितकेच वाटत होत. आज तोच हॉल होता तशीच सजावट. आणि मनात तशीच हुरहूर होती . फक्त वर्गातले सारे जण नव्याने भेटत होते कोणी खूप मोठे झाले होते. बाहेरच्या जगात टक्केटोणपे खाऊन जबाबदार झालेले . काही चेहरे तसेच होते आणि काही एकदम निराळे, ओळखू न येणारे. मुलांपाठोपाठ बाई येत होत्या …  कर्वे बाई,दाभाडे बाई , व्यवहारे बाई ,बोंडे बाई जावळेकर  बाई . त्या सर्वांच्याच डोळ्यात कौतुक होत ,प्रेम होत सगळ्यांच्याच भावना दाटून आल्या होत्या 

                                                                                                         
कार्यक्रमाची सुरुवात इतकी सुंदर झाली. सगळ्यांना बिल्ले दिले गेले . मला आठवतो आहे बिल्ला अजून  'उत्तिष्ठ जाग्रत' असे लिहिलेला . शाळा भरताना होते तशी घंटा वाजली. सर्वांनी एकत्र राष्ट्रगीत म्हटले . नंतर बाई  वर्गात आल्यावर म्हणायचो तसे 'एकसाथ नमस्ते' देखील झाले . एकदम जुने दिवस आठवले। 
औपचारिक स्वागत झाल्यावर आमच्या त्यावेळच्या हेडबाईनी कुलकर्णी बाईनी बोलायला सुरुवात केली . खूप मनापासून बोलल्या त्या. त्यांच्या डोळ्यातून त्यांच्या भावना स्पष्ट दिसत होत्या . मला त्याही वेळी त्यांच्याबद्दल खूप आदर होता भीती होती त्यादिवशी त्या जे काही बोलल्या  त्यामुळे तो आदर आणखीनच वाढला शाळेसाठी त्यांनी घेतलेली मेहनत,त्यांचे कष्ट , त्यांना आलेले बरे वाईट अनुभव त्यांनी आमच्यासोबत इतक्या मैत्रीपूर्ण भावनेतून व्यक्त केले . मन एकदम भूतकाळात जात होत. का बर मोठे झालो आपण? परत  त्याच जगात जाता आल तर ??? काळाच चक्र जर मागे फिरवता  आल असत तर???  मनातल्या मनात असा आठवणीचा पाठशिवणीचा खेळ सतत चालू होत. काय म्हणतात त्याला flashback… बाहेर अखंड पाऊस सुरु होता आणि आमच्या मनात आठवणींचा ,विचारांचा हैदोस सुरु होता.
 कार्यक्रमाचा दुसरा टप्पा होता तो म्हणजे प्रत्येकाने समोर येउन सर्वाना स्वतःबद्दल काहीतरी सांगणे. कठीण वाटले . सोपे होते खरतर नाही का ??  सगळ्यांच्याच मनात तीच भावना होती कदाचित.  वेगवेगळ्या क्षेत्रात स्थिरावलेले सारे जण. वेगवेगळ्या दिशांना पांगलेली सारी पाखरे आज या वास्तूत परत  एकत्र जमली होती.शाळेच्या , बाईंच्या , मित्रमैत्रिणींच्या आठवणी ताज्या करत होती . कोणी अगदी मोघम बोलले कोणी खूप भारावून गेले . तर  काहींनी आपल्या आठवणीना कवितेचा सुंदर साज चढवला. कस काय जमत असेल नाही इतकी सुंदर कविता लिहिण .मुकुंद आणि अमेयच्या कविता खरोखरीच सुंदर होत्या शक्य झाले असते तर लिहूनच घेतल्या असत्या.
तिसरा आणि शेवटचा टप्पा होता स्नेहभोजन आणि ग्रुप फोटो . जेवण छान होतेच सगळेच जण तसेही तृप्तच होते. पर्णील ,कपिल विजय यांच्यासारखे असे काही जण जे भारताबाहेर असल्यामुळे या कार्यक्रमात सहभागी होऊ शकले नाहीत त्यांनी आपले मनोगत सांगणारे असे video पाठवले होते ते दाखवले गेले . अमेय आणि अर्चना यांनी काही गाणी म्हटली . अभयने गिटार वाजवून दाखवली या सगळ्या छोट्या गोष्टीनी त्या कार्यक्रमाची शोभा अजूनच वाढवली. 
पाऊस कोसळतच होता तरी आम्ही बाईंसोबत एक ग्रुप फोटो काढला आमच्या सर्वांच्या आयुष्यातला तो सुंदर दिवस त्या कॅमेरात कैद करून टेवला कायमचा …


(जावळीकर बाईनी माझ्या खांद्यावर हात ठेवून एकदम चौकशी केली आणि म्हणाल्या . 'छान दिसतेस थिटे अजून' मला काय सोलिड वाटल त्या वेळी एकदम . आकाश ठेंगण झाल .!!!!!) 

 परत हात हलले आणि तृप्त मनाने आम्ही घराकडे निघालो. 

घरी पोचले तेव्हा मी पाच मिनिट नुसती शांत बसले. आई बाबा खूप उत्सुक होते  सार काही ऐकायला . त्यांना,जुईला सर्व वृतांत देताना मला देखील भरून आल .एखाद वेळीस वेडेपणाच वाटेलही कदाचित पण डोळ्यांच्या कडा ओलावल्या सार सांगताना .'What is so great  about it ,aai '? या जुईच्या प्रश्नाकडे माझ्याकडे उत्तर काहीच नव्हत मी तिला एवढच सांगू शकले जे शालेय जीवन ती आत्ता अनुभवते आहे त्याच्या इतक सुंदर जगात क्वचितच मिळेल. उद्या मोठ झाल्यावर पंख  फुटल्यावर तिला त्या शाळारूपी घरट्याची उब परत ओढ लावेल हे निश्चित. !!!!!




3 Comments:

At 28 July 2013 at 20:45 , Blogger Ameya said...

Very Nice.. Punha ekda to divas jagalyasarakha watala.

 
At 29 July 2013 at 23:28 , Blogger dipti said...

tu kiti chhan lihites!! very nice... shalet marathi nibandhat nehmi full marks milat astil..but any way nice to be able to express feelings..

 
At 7 August 2013 at 07:43 , Blogger Mrunalini said...

masta..those were the best days of my life.. he Bryan Adams cha gaaNa aathavata mala.. shalet asto tevha motha hoycha asta patkan aani mothe jhalo ki vatata, shalet ajun ek diwas hava hota!!!

 

Post a Comment

Subscribe to Post Comments [Atom]

<< Home