Friday 29 June 2012

तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल

लहानपणीची एक छान आठवण आहे ६-७ वर्षाची असताना आजोबांकडे एक कीर्तनकार येत असत. त्यांचे निरुपण ऐकण्यासाठी अंगणात गर्दी होत असे. त्यांचे बोलणे कळत नसे पण टाळ आणि चिपळ्या घेऊन ते  
'ग्यानबा तुकाराम ज्ञानोबा तुकाराम .. महाराज ज्ञानेश्वर माउली ज्ञाराज माउली तुकाराम , ग्यानबा तुकाराम'
या तालावर नाचत असत ते मात्र लख्ख आठवते. तो ताल आणि ठेका कायमच स्मरणात राहिला. शाळेच्या पाठ्यपुस्तकातून संतांची ओळख होत गेली. आषाढी कार्तिकी एकादशीला घरात आईने केलेली उपासाच्या पदार्थांची चंगळ जास्त मौजेची वाटली. पण लक्षावधी लोक अनेक दिंड्यातून पायी चालत विठूनामाचा गजर करत मोठ्या श्रद्धेने पंढरपूरला 
पोचतात हे कळल्यावर या पंढरपूर वारीविषयी मनात कायम एक उत्सुकतेची भावना  होती.गळ्यात तुळशीची माळ, कपाळावर गंध बुक्का आणि हातात टाळ , गळ्यात  मृदुंग क्वचित कधी डोक्यावर तुळस आणि तोंडाने अखंड विठूनामाचा गजर करणारे लाखी वारकरी कोणत्या अशा ध्येयाने  पछाडलेले असतात? वाटेल जमेल तशी विश्रांती घेत निग्रहाने कसे काय चालत राहतात? ध्येय एकच असते विठ्ठलाचे  दर्शन ..

काल माझ्या लेकीला हे सगळे समजून सांगताना नाकी नऊ आले. एवढे सगळे जण जातात कुठलीही AC गाडी न करता, फक्त पायी आणि खाण्याचे सामान बरोबर घेऊन ??? एवढे करायचे कशाला सरळ गाडी करायची आणि दर्शन घेऊन यायचे . त्याचा मतितार्थ तिच्यापर्यंत पोचवणे हे जरा कठीणच काम वाटले.. आपण जसे शाळेत नित्य  नेमाने जातो तसे नित्यनेमाने दरवर्षी पंढरपूरला पायी चालत जाणार्या वारकर्याचा एक संप्रदाय आहे हे  तिला कळणे कठीण होते.

ग्यानबा तुकाराम चा ठेका तिला इंटरनेटवरून शोधून  ऐकवला आणि मग मला जशी या एकादशीची माहिती आई बाबांनी सांगितली होती आणि थोडी इंटरनेट वरून शोधून तिला सांगायचा प्रयत्न केला. या सगळ्या प्रयत्नात  मला देखील  बऱ्याच नवीन गोष्टी कळल्या.
संपूर्ण वर्षभरामध्ये साधारण  २४ एकादशी येतात
या सर्वांमध्ये आषाढी आणि  कार्तिकी एकादशीला अनन्यसाधारण महत्व आहे. आषाढी एकादशीला भगवान विष्णू झोपी जातात म्हणून तिला शयनी एकादशी म्हणतात आणि कार्तिकी एकादशीला प्रबोधिनी एकादशी असे म्हणतात , या दिवशी भगवान विष्णू जागे होतात.आषाढी एकादशीपासून सुरु झालेला चातुर्मास (४ महिन्यांचा काळ ) कार्तिकी एकादशीला संपतो. या ४ महिन्यात आपण निरनिराळी व्रत वैकल्ये करतो . श्रावण महिना तर निरनिराळ्या सणांनी चांगलाच जागवतो . भाद्रपदात गणपती अश्विन महिन्यात देवी बसवतो कार्तिक मध्ये खंडोबाचे नवरात्र करतो आणि अशा तर्हेने   अखंड ४ महिन्यांचा हा काळ आपण या देवाच्या नामस्मरणात घालवतो. हिंदू संस्कृतीतल्या कोणत्याही रूढी आणि परंपरेला काहीतरी निश्चित कारण आहे हे नक्की . ते आपण डोळे उघडे ठेवून शोधले पाहिजे.

आषाढ महिन्यातली हि एकादशी हि फार पवित्र मानण्यात येते.हिला महाएकादशी  असेही म्हणतात. आषाढीस देहुंहून  तुकाराम महाराजांची,आळंदीहून संत ज्ञानेश्वरांची ,पैठणहून एकनाथ महाराजांची अशा पालख्या पंढरपुरात दाखल होतात.या सर्व पालख्या आणि वारकरी चंद्रभागेच्या तीरावर एकत्र जमतात या साऱ्या लोकांना बळ कोण देत असावे अर्थात ती दैवी शक्ती तिचाच प्रत्यय या एकादशीस पंढरपुरात येत असावा .

सन १२९१ मध्ये आळंदीहून  पंढरपूरला जाणारी पहिली  दिंडी निघाली होती. पंढरपुरास जाणाऱ्या या वारीला दिंडी म्हणतात प्रत्येक दिंडीचा एक वीणेकरी असतो  ज्याच्या गळ्यात वीणा असते . प्रत्येक दिंडीचे ध्वज असतात. दिंड्या , पालखी आणि मग परत दिंड्या असे याचे स्वरूप असते. विठ्ठलाचे अभंग गात हि वारी अखंड चालू असते


वाटेत चालता एकसुरीपणा येऊ नये म्हणून निरनिराळे मनोरंजनाचे कार्यक्रम करतात. त्यातलाच एक प्रकार म्हणजे रिंगण. यात मोठ्या मैदानात हे वारकरी एकत्र जमतात अश्व आणि ध्वज मध्यभागी ठेऊन एक रिंगण तयार करतात. या रिंगणात रांगोळ्यांच्या पायघड्या घालतात. वारकरी झिम्मा ,फुगडी ,लेझीम ,भारुड असे पारंपारिक खेळ खेळतात. वेगवेगळ्या ठिकाणाहून येणाऱ्या या पालख्या एकादशीच्या दिवशी पंढरपुरात दाखल होतात आणि द्वादशीला आपल्या मार्गे परत जातात .


कदाचित आजच्या पिढीला जी शाळेत घडते आहे तिला हे सगळे कळेल असे नाही ८-९ वीच्या इंग्रंजीच्या पुस्तकात एखादा तुकारामांचा अभंग (Poetic verses of Tukaram या  नावाखाली) असेलही आणि  हि मुल  ते अभंग (verses ) वाचून पाठांतरासाठी तो घोकतीलही (Sant Tukaram was a great devotee of Lord Viththala ) पण त्यामागचे मर्म थोड्या फार प्रमाणात आपण त्यांना समजून देवू शकलो तर अधिकच चांगले.

 हे असे सगळे आपल्या देशातच घडते. बाहेरच्या देशातून लोक हा सोहळा बघायला येतात काही अगदी दिंडीत सामील देखील होतात. आपण हे सर्व करू अथवा न करू निदान आषाढी म्हणजे निव्वळ साबुदाण्याची खिचडी,वरी तांदूळ , दाण्याची आमटी, रताळ्याचा कीस यांचा आस्वाद इतकाच अर्थ न लावता शेकडो वर्षांची परंपरा जोपासणारे वारकरी आणि त्यांना ओढ लावणारी विठूमाउली यांचे स्मरण  निश्चितच करू शकतो.

 आपणही किती धावत असतो . घर ऑफिस नातेवाईक मित्र सहली .  स्वताभोवती आखलेल्या रिंगणात  कायमच  स्वतःच्या सुखासाठी .... मग अशा वेळी हे सर्व सोडून फक्त काही दिवस त्या जगनियंत्या परमेश्वराच्या ओढीने शेकडो मैल चालत जाणारे हे वारकरी निशितच वेगळे नाहीत का???

1 Comments:

At 31 October 2014 at 02:20 , Blogger पंकज said...

छान वाटलं तुमचा लेख पाहून … :)

 

Post a Comment

Subscribe to Post Comments [Atom]

<< Home