Sunday 25 August 2013

स्वानंद

 प्रसिद्ध लेखक पु.ल देशपांडे म्हणतात ,

आयुष्यात मला भावलेलं एक गुज सांगतो. उपजिविकेसाठी आवश्यक असणाऱ्या विषयाचं शिक्षण जरुर घ्या. पोटापाण्याचा उद्योग जिद्दीनं करा, पण एवढ्यावरच थांबू नका. साहित्य, चित्र, संगीत, नाट्य, शिल्प, खेळ ह्यांतल्या एखाद्या तरी कलेशी मैत्री जमवा. पोटापाण्याचा उद्योग तुम्हाला जगवील, पण कलेशी जमलेली मैत्री तुम्ही का जगायचं हे सांगून जाईल.


किती समर्पक आहेत हे उद्गगार. कोणतेही वर्तमानपत्र , मासिक घ्या त्यात रंगभूमी ,संगीताला एक वेगळी जागा दिलेली असते . एखादी कथा असेल, कविता असतील लहान मुलांनी काढलेल्या चित्रापासून ते अत्यंत प्रसिद्ध अशा एखाद्या चित्राचे उल्लेख केलेले असतात . लोकांचे  अभिप्राय दिलेले असतात .एखादा नवीन चित्रपट नवीन नाटक  येण्याचा अवकाश त्याच्या जाहिराती आणि नंतर लोकांच्या प्रतिक्रिया वर्तमानपत्रातून उमटल्याशिवाय राहणार नाहीत . वेगवेगळ्या कलांचे प्रतिबिंब  रोजच्या जीवनात आपल्याला कायमच दिसत असते. हिंदू शास्त्रात जवळ जवळ ६४ कलांचा उल्लेख केला गेला आहे . ज्यात अगदी गायन नृत्य अभिनय ते चित्रकला ,शिल्पकाम  आणि अशा  कित्येक कलांचा समावेश असेल. या सगळ्या कला आत्मसात करणे हि केवळ अशक्यप्राय गोष्ट आहे पण यातली एखादी तरी कला आत्मसात करता आली तिचा आस्वाद घेता आला आणि आपल्याबरोबर इतरानाही तो आनंद वाटता आला तर  त्यासारखे दुसरे सुख नाही .

मी जेव्हा शाळेत जात होते त्यावेळीस आमच्या घरापासून थोड लांब असेल कदाचित पण एक नृत्याचा क्लास होता .कोणता नृत्य प्रकार तिथे शिकवला जायचा ठाऊक नाही कारण त्यावेळीस त्यातलं फारस काही कळत नव्हत . घरी तसे वातावरणच नव्हते. म्हणजे सांस्कृतिक वातावरण नव्हते असे नाही . उलट खूप लहान असल्यापासून मला माझ्या आई  बाबांनी पुस्तकाची आवड लावली होती . सुट्टी सुरु झाली कि वाचनालयाची मेंबरशिप ठरलेली असायची . एखादे चांगले नाटक , चांगले चित्रपट इतपर्यन्तच आमची सांस्कृतिक मजल होती . पायात घुंगरू बांधल्यावर जो मधुर नाद कानात आणि मनात भिनतो त्याची तेव्हा ओळखच झाली नव्हती .
म्हणूनच असेल कदाचित पण नंतर मोठे झाल्यावर कॉलेजमध्ये आणि नंतरही  dance हे काही आपले क्षेत्र नाही हे अगदी पक्के मनात रुजले होते .

स्वानंद कला प्रसारक केंद्राची शाखा आमच्या घराजवळ सुरु झाल्यावर मी जुईला तिथे smallwonder  batch  मध्ये  घातलं . अवघी तीन वर्षाची होती जुई तेव्हा. या वयातली मुल तशीही खूप गोड असतात पण जुई मनापासून रमायची तिथे. तेव्हा हळू हळू कळू लागल कि नृत्याचे वेगवेगळे प्रकार आहेत त्यातलाच एक कथक नृत्य प्रकार . केंद्राच्या संचालिका सौ स्वाती संदीप कोल्ळे यांचे त्यावर्षीच्या स्वानंद प्रसारक केंद्राच्या वार्षिक  स्नेह्सम्मेलानातले नृत्य पाहिले आणि तेव्हाच ठरवले आपण जुईला यांच्याकडेच शिकवायचे . किती अप्रतिम नृत्य केले होते त्यांनी त्यावेळी . महाभारतातील द्रौपदी वस्त्रहरणाचा प्रसंग भावांगातून इतका सुंदर दाखवला होता. तेव्हा वाटले याहून अजून सुंदर नृत्य काय असू शकेल?




जुईच्या गांधर्वच्या पहिल्या परीक्षेच्या वेळी तिचा अभ्यास घेतला तिच्याकडून परीक्षेची तयारी करून घेताना पहिल्यांदा या नृत्यामागे काय शास्त्र आहे याचा उलगडा झाला. नृत्यकला म्हणजे काय याचे खूप छान स्पष्टीकरण डॉ सौ मंजिरी देव यांनी त्यांच्या पुस्तकात केले आहे . त्या म्हणतात, आपल्याला झालेल्या आनंदाची अभिव्यक्ती म्हणजेच नृत्य करणे होय. जर एखाद्या गोष्टीमुळे आनंद झाला तर आपण ती गोष्ट परत परत आठवून,टाळ्या वाजवून,स्वतःभोवती गिरकी घेऊन उड्या मारून व्यक्त करतो आपल्या वागण्यातून तो आनंद , रोमांच प्रकट होतो . यालाच त्या नृत्यकलेची पहिली पायरी म्हणतात .नुकतेच चालायला लागलेले लहान मुल देखील एखाद्या गाण्याच्या तालावर पाय हलवते . एखाद्या परीक्षेत आपल्याला खूप छान गुण मिळाले किंवा आपले कोणीतरी कौतुक केले तर आपल्याला खूप आनंद होतो   हा आनंद मग इतरांसोबत वाटणे आपल्याला जास्त हवेहवेसे वाटते . आनंदाच्या स्वाभाविक उर्मीतून , आपल्याला झालेला आनंद इतरांसोबत वाटायच्या इच्छेतूनच नृत्याचे पुढील रूप विकसित झाले असावे  .मनाची सुखमय अवस्था म्हणजे न्रुत्यकला . किती छान आणि सोप्या भाषेत सांगितले आहे ....

जुईकडून सगळ्या व्याख्या पाठ करून घेण्याआधी मी त्या सगळ्या वाचल्या . अख्ख पुस्तकच वाचल म्हणा ना . आणि वेगळ्याच सुंदर विश्वात आपण जुईला घेऊन जातोय असे जाणवले .

कथक हि नृत्यशैली उत्तरभारतातून आपल्याला लाभलेली शैली आहे . कथा सांगणारा तो कथक . अशा कथा सांगणाऱ्या लोकांची एक वेगळी जमात बनली . पुराणातली कथा सांगून हे कथक सामाजिक प्रबोधन करत. आपल्या कथाकथनाला नृत्याची जोड देऊन हे कथक कलाकार देवासमोर तल्लीनतेने नृत्य करत असत.
भारत देश पारतंत्र्यात असताना मोघल बादशहाना या नृत्याने भुरळ घातली होती . मंदिरातील हे नृत्य त्यांनी दरबारात आणले आणि त्याची नाळ रंजकतेशी जोडली गेली . उत्तर भारतात कथक जिथे बहरले त्या त्या प्रांताच्या नावाने ते ओळखले जाऊ लागले . त्या काळी मंदिरात होत असे तशी वंदना आजही कथक कलाकार नृत्याच्या सुरुवातीस आपल्या गुरूला वंदन करून सादर करतात .   कित्येक कथक कलाकारांनी त्यातले सृजनत्व जपून या नृत्यातले पावित्र्य आपल्यापर्यंत पोचवले आहे .

हे नृत्य शिकताना त्यामध्ये वापरल्या गेलेल्या परिभाषा शिकणे हे देखील आवश्यक आहे मात्रा ,लय सम हे सगळे समजून घेणे अत्यंत आवश्यक आहे. म्हणजे जसे आज आपण ५ अंकी बेरजा वजाबाक्या अगदी पटापट करतो पण त्यासाठी लहान असताना  पाटीवर अनेकवेळा गिरवलेले अंक हे तितकेच महत्वाचे . निबंध  लिहिण्याआधी अक्षर ओळख होणे गरजेचे. तसेच मला जसे जमले तसे पुस्तकाच्या आधारे  मी यामागचे सारे शास्त्र जुईला समजावून सांगितले . मलाही किती गोष्टी नवीन कळल्या
मी स्वतः कधी नृत्य केले नसले तरी तिला हे सगळे करताना पाहून छान वाटते.

नुकताच जुईच्या केंद्राचा गुरुपौर्णिमेचा कार्यक्रम झाला. तेव्हा केंद्रातील वेगवेगळ्या परीक्षांना बसलेल्या मुलींची नृत्य सादर झाली .या कार्यक्रमाने एक वेगळीच उर्जा दिली शिकणाऱ्या मुलीनाही आणि त्यांच्या पालकाना देखिल.  अजूनच उत्साह आला . स्वाती टीचरनी या कार्क्रमाच्या शेवटी एक सुंदर नृत्य केले. संत गोरा कुंभार मडकी बनवण्यासाठी लागणारी माती तुडवीत असताना   पांडुरंगाच्या नामस्मरणात तल्लीन झाले होते अजाणतेपणी मातीसोबत  त्यांच्या पायाखाली त्यांचे रांगते मुल आले आणि ते देखील तुडविले गेले. बाहेरून परत आलेल्या पत्नीच्या जेव्हा हा सारा प्रकार लक्षात आला तेव्हा तिने आक्रोश केला. गोरा कुंभारांनी आपले नामस्मरण चालू ठेवले आणि पांडुरंगाचा धावा करीत राहिले . विठ्ठलाच्या आशीर्वादाने ते मुल त्यांना परत मिळाले . हा पूर्ण प्रसंग त्यांनी इतक्या उत्कृष्ठ रीतीने  सादर केला कि शब्दच अपुरे पडतील त्यांचे वर्णन करायला.तल्लीन झालेले गोरा कुंभार , रांगणारे निरागस मुल , पुत्रशोकाने टाहो फोडणारी आई आणि कर कटावर ठेवलेले भक्तांच्या गळ्यातले ताईत असलेले पांडुरंग या साऱ्या व्यक्तिरेखा त्यांनी इतक्या सहजपणे आणि तालबद्ध रीतीने अभिनय करून सादर केल्या कि त्याला काही तोडच नाही.

आणि माझ्या लक्षात आले कि आज आजूबाजूला वेगवेगळ्या स्पर्धांमधून ,सांस्कृतिक कार्यक्रमातून, reality shows मधून दिसणाऱ्या प्रचंड टाळ्या आणि शिट्या च्या गजरात once more मिळवणारया अशा  कितीतरी नृत्यासारखे glamour या नृत्याला दिले जात नसले तरी पण महत्वाची आहे ती साधना .कित्येक वेळा वयाला न शोभणाऱ्या  आणि त्याहून महत्वाच म्हणजे न समजणाऱ्या गाण्यांवर dance  करण्यापेक्षा एखादा निर्मळ विचार लोकांपर्यंत तल्लीनतेने पोचवणारा , संस्कारातून ज्याची सौंदर्यपूर्ण जडणघडण झाली आहे , ज्यात परमेश्वरचरणी लीन होईल असा भक्तिभाव आहे तसेच श्रीकृष्णाच्या नटखट  लीलांचा अंतर्भाव आहे असा एक सुंदर नृत्यप्रकार  जुई शिकत आहे याचा प्रचंड अभिमान वाटला

खरतर एखाद सुंदर फुल पाहिले त्याचा सुवास दरवळला  किंवा सकाळी एखादे छानसे आवडते गाणे ऐकले तर दिवसभर ते गुणगुणत रहावेसे वाटते  मनाला एक वेगळाच आनंद मिळतो . या आनंदाची काही व्याख्या करता येणार नाही , ती गोष्ठ अनुभवता आली पाहिजे. त्या अनुभूतीमध्ये एक वेगळ्या प्रकारच समाधान मनाला मिळाले  पाहिजे.तसेच काहीसे या नृत्याचे देखील आहे पण एक मात्र खरे कलानिर्मितीतकाच कलेचा आस्वाद देखील तितकाच महत्वाचा . .

शास्त्रीय नृत्य म्हणजे काहीतरी जुनं अशी काहीशी लोकांची धारणा होती .अजूनही काही लोक या नृत्य प्रकारांकडे याच दृष्टीकोनातून पाहतात. dance  reality shows मध्ये स्थान मिळवण्यासाठी  शास्त्रीय  नृत्य शिकत असलेली मुल मागे पडतात असाही काहीसा समज आहे. पण आपण हि गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे कि अगदी पुराणकाळापासून चालत आलेले, कित्येक कलाकारांनी घडवलेले आणि गुरुनी दिलेला ज्ञानरूपी  वसा पुढे चालवण्याचे ध्येय ठेवून  जपलेले हे नृत्यप्रकार अजूनही टिकून आहेत. आपले पाय घट्ट रोवून आहेत.स्पर्धेत जिंकणे हे महत्वाचे आहे पण त्याहीपेक्षा लाख पटीने मोलाचा  आहे नृत्यातून व्यक्त होणारा आनंद . हा स्वानंद इतरानाही तितक्याच प्रभावीपणे पोचवता आला तर ती खरी नृत्यकला ।

सर्वांगसुंदर, उत्स्फूर्त तितकीच प्रयोगशील आणि आशयघन अशी हि कला अशीच फुलत राहो हीच इच्छा.
कारण वर उल्लेख केल्याप्रमाणे कलेशी जमलेली हि मैत्रीच तर जगण्याच मर्म सांगणार आहे .

पु ल देशपांडे यांचा उल्लेख करावा असा अजून एक उतारा मध्यंतरी वाचनात आला

माझ्या एक सामान्य आर्थिक परिस्थितीतले स्नेही आपल्या आठनऊ वर्षांच्या मुलाला घेऊन गाण्याच्या बैठकीला आले होते. मी विचारले, "मुलाला गाण्याची... आवड आहे वाटतं?"
ते म्हणाले, "नक्की सांगता येणार नाही मला, पण लागावी अशी इच्छा आहे. गेल्या खेपेला कुमार गंधर्वांच्या गाण्याला घेऊन गेलो होतो. आज ह्या गाण्याला यायचंय का, असं विचारलं आणि 'हो' म्हणाला, म्हणून आणलं. त्याला लागलीच चांगल्या गाण्याची आवड तर आनंदाचा धनी होईल. दुसरी काय इस्टेट देणार मी त्याला? आयुष्यभर बरोबर बाळगील अशा चार चांगल्या आठवणी देतो-"
'संस्कार' ह्याचा अर्थ ह्या बापाला कळला असे मला वाटते.



आई वडिलांनी मुलांना अभिमान द्यावा ,जीवन सुंदर कसे करावे हे सांगावे . जे जे उत्तम आणि सुंदर आहे त्याचा ध्यास त्यांना कसा बाळगता येईल हे शिकवले तर  संस्कृती आपोआपच जपली जाईल असे वाटते .




1 Comments:

At 9 January 2014 at 02:36 , Blogger Mrunalini said...

Keep it up Vaishali and lots of good wishes to Jui. Mi hi teen parikshya dilya hotya shaalet astana kathak chya, pan pudhe nahi continue kela.. Jui ne chaan kahitari karava hyaat ashi sadhiccha!!

 

Post a Comment

Subscribe to Post Comments [Atom]

<< Home