Wednesday, 30 March 2016

The real "Shooting Star"


 
पहाटे मोबाईलवर वाजणाऱ्या गजराने जाग  आली  आणि उठून बसले  तेव्हा डोळ्यासमोर आली  फक्त कामाची यादी !!!  चहा,नाश्ता, डबे ,शाळा ,अभ्यास, घर ,स्वतःचे  क्लासेस , जुई शाळेतून आली की  तिचे क्लासेस एकामागून एक नुसती न संपणारी कामं. हल्ली तर सकाळची सुरुवातच मूळी  पाणी भरण्यापासून होते. स्वतःसाठी  फारसा वेळ कधी काढावा म्हटलं तरी मिळत नाही.

कधीतरी वाटत जरा थांबावं आणि खुशाल  मोकळ  आणि बिनधास्त जगावं , नेहमीच्या दिनक्रमापासून वेगळ. करावा एखादा  प्रवास , जीव गुदमरवून टाकणाऱ्या गर्दीपासून दूर शांत अशा निसर्गरम्य ठिकाणी. अनुभवावी नागमोडी वळण घेत दूरवर दिसेनाशी  होणारी पाऊलवाट, खळाळणारे झरे, धबधबे, दूरवर जाऊन क्षितिजाचा ठाव घेऊ पाहणाऱ्या पाऊलवाटा आणि आकाशाच्या पटलावर  मुक्तछंदा ने रंगांची उधळण करणारा  निसर्ग.

घार हिंडते आकाशी , चित्त तिचे पिलापाशी या उक्तीप्रमाणे मन जरी त्या मोकळ्या वातावरणात रमले तरी पुन्हा आपले पाय आपल्या घरट्याकडे  वळतातच. कौटुंबिक गोष्टीत आपण इतके गुरफटत गेलो आहोत की आता प्रवास फक्त उरलाय तो उन्हाळ्याच्या  सुट्टी पुरता !!!!!!  

 पण अशी एक व्यक्ती आहे जी , हे  प्रत्येकाने थोड्या फार फरकाने बघितलेलं स्वप्न प्रत्यक्षात जगत आहे, अविरत  प्रवास करत आहे , ती  म्हणजे 'शिव्या नाथ'. डेहराडून मधल्या एक मध्यमवर्गीय परिवारात जन्मलेली ही  मुलगी.
ही अखंड प्रवासी कशी झाली याची गोष्ट खूप गमतीशीर आहे.



सिंगापूरमध्ये शिक्षण पूर्ण केल्यावर, तेथील  पर्यटन क्षेत्रासाठी काम करत असताना तिला या प्रवासाची आवड निर्माण झाली.
 आपल्या सगळ्यांप्रमाणेच रोजच्या त्याच त्याच आयुष्याला कंटाळून काहीतरी वेगळ केल पाहिजे अशी तिची इच्छा असावी बहुधा.
 देवाची किमया बघा,  'Facebook' वरच्या एका स्पर्धेत  तिने भाग घेतला आणि तिला फ्रांस ला जायची फ्री तिकीट  मिळाली. क्षणाचाही  विलंब न करता तिने सरळ दोन महिन्याची रजा टाकली .


 आणि अशा प्रकारे वयाच्या निव्वळ २३ व्या वर्षी  तिच्या nomadic आयुष्याची खरी सुरुवात झाली.

या प्रवासामध्ये निसर्गाने तिच्यावर एवढी भुरळ घातली की ,  तिथून परतल्यावर सर्वसामान्यांसारखे नेहमीच्या रटाळ आयुष्याला न स्वीकारता तिने सरळ नोकरीचा राजीनामा दिला आणि मनाशी ठरवलं कि इथून पुढे अखंड प्रवास करायचा, वेगवेगळे देश , नवीन जागा , अनवट  वाटा अनुभवायच्या .जवळजवळ २ वर्षांनतरही तिची हि प्रवासाची ओढ कमी झाली नाही.  उलट तिने तिचे राहते घर विकून आपला हा छंद  आणि व्यवसाय तसाच चालू ठेवला.  जगण्याचा हा निखळ आनंद  'Travel Blog ' च्या माध्यमातून लोकांपर्यंत पोचवला.  Europe ,Latin  America South  America,Africa ,Asia  अशा वेगवेगळ्या खंडातून  वेगवेगळ्या ठिकाणी ती प्रवास करते आहे. स्वतःची प्रवासाची हौस पूर्ण करताना लागणार आर्थिक पाठबळ देखील ती स्वतःच्या कष्टातून मिळवते आहे,'Travel  Blog' च्या माध्यमातून . आपल्या छंदालाच उपजीविकेचे साधन बनवून त्यात आयुष्याचा खरा आस्वाद घेणारी अशी "शिव्या नाथ" सारखी माणस विरळाच. 



प्रवासाची  आवड सर्वांनाच असते. काहीतरी नवीन  अनुभवण्यासाठी उत्सुक असलेल आपल  मन, काहीतरी वेगळ अनुभवण्याची इच्छा ,साहसी वृत्ती हि माणसाला कधीच स्वस्थ बसू देत  नाही. प्रवासाची  ओढ त्याला लहानपणापासूनच  मिळालेली असते. अगदी रांगणाऱ्या  मुलाला देखील तुम्ही 'भूर' नेतो अस सांगितलत  तर ते देखील तुमच्याकडे चटकन  झेपावते. 
शाळकरी वयात वर्षाकाठी निघणारी शालेय सहल काय किंवा नंतर महाविद्यालयात गेल्यावर मित्र मैत्रिणीबरोबर स्वतःच केलेली मुक्त भ्रमंती काय सार  काही त्या प्रवासाच्या ओढीनेच. वयपरत्वे हा प्रवास आनंदापेक्षा गरज म्हणून केला जातो.


प्रवाशांचे  खरेतर दोन प्रकार आहेत  प्रवास करणारे आणि दुसरे प्रवासाची हौस असलेले.
निव्वळ प्रवास करणारे एखाद्या ठिकाणी जायचं म्हणून प्रवास करतात.  त्यांना प्रवासाचा आनंद घेता येत नाही .  पाहिलेली  स्थळे , त्यातलं सौंदर्य या व्यक्तींच्या फारस काही लक्षात राहत नाही . यांचा प्रवास जीवन समृद्ध करणारा , जाणीवा विशाल करणारा  नसतो.
प्रवासाची हौस असलेले मात्र स्वतः नियोजन  करून प्रवास करतात . प्रवासाच्या प्रत्येक क्षणाचा ते आनंद घेतात. प्रत्येक प्रवास हा त्यांच्यासाठी जीवन समृध्द करून टाकणारा एक अनुभव असतो. 

अशा प्रवासाची हौस असलेल्या आणि स्वतःच्या मनाप्रमाणे बेफाम  आणि स्वच्छंद आयुष्य जगणाऱ्या                'शिव्या नाथ' सारख घरदार सोडून पूर्ण वेळ प्रवासी होता नाही आल तरी एखादा दिवस बेधुंद जगायला काय हरकत आहे?

तिच्याच शब्दात सांगायचं झाल तर 
"Twenty years from now you will be more disappointed by the things that you didn't do than by the ones you did do. So throw off the bowlines. Sail away from the safe harbor. Catch the trade winds in your sails. Explore. Dream. Discover."






(जर तुम्हालाही या 'शिव्या नाथ' बद्दल , तिच्या या आगळ्यावेगळ्या प्रवासाबद्दल कुतूहल निर्माण झाले असेल तर तुम्ही देखील तिचा 'http://the-shooting-star.com/' हा blog  बघू शकता . आणि तिच्याबद्दल अजून माहिती मिळवू शकता . सध्या ती 'Ecuador ' या  नयनरम्य देशाचा अनुभव घेत आहे. )








Friday, 25 March 2016

आताशा अस का होत काही कळत नाही
शब्द आणि गंधाच नात काही केल्या जुळत नाही 


लिहायला बसल की
आठवतात हजार गोष्टी  
घर,मुल, अभ्यास, नवरा आणि नोकरी    

या सगळ्याचा विचार बाजुला सारून लिहायला बसल तर           
मनात येतो तो न आलेल्या कामवालीचा  विचार
 आणि अडचणीत टाकते ती
 असंख्य न सुटणार्या प्रश्नांची घरघर



खरच आताशा अस का होत काही कळत नाही
शब्द आणि गंधाच नात काही केल्या जुळत नाही

खूप ठरवुन
सगळ्या जाणीवा एकवटुन आज काही लिहायचच अस मनाशी बजावुन
जरी लिहायला बसलो तरी
मनातल्या  भावना  काही केल्या कागदावर उतरत नाहीत 
शब्द आणि गंधाच नात काही केल्या जुळत नाही 

पुर्वीच जग सगळ छान होत

वार्यावरच फुलपाखरू, अवचित आलेली पावसाची सर सारच कस मुग्ध करून जायच
दाटुन आलेले ढग आणि संधीप्रकाशाची हुरहुर सार काही मनातल्या कविला स्पर्शुन जायच 

आठवतो तो राग परिस्थितीवर काढलेला 
जळजळीत शब्दांनी कवितेतुन मांडलेला

आठवते ती लेखमाला काॅलेजसाठी लिहिलेली
असंख्य पुस्तके फक्त स्वतःसाठी वाचलेली

आवडलेल्या लेखकांची वाक्य वहीत नोंदून  ठेवलेली
आणि मोजकीच  पत्र मोजक्याच मैत्रिणींसाठी मनापासून लिहिलेली

सांगून खोटच वाटेल कदाचित पण  शब्द न सांगताच यायचे
 ओंजळभर सुख न मागताच देऊन जायचे 

आता मात्र सार काही निराळ
पुस्तक तीच  आणि फुलपाखरही  तीच पण
शब्दांना काही गंध येत नाही
वेडावुन टाकणारा सुर काही केल्या सापडत नाही 

शब्द आणि गंधाच नात काही केल्या जुळत नाही
शब्द आणि गंधाच नात काही केल्या जुळत नाही

आताशा अस का होत काही कळत नाही…