ऋणानुबंधाच्या जिथून जुळल्या गाठी
शाळा एक अनमोल संस्कार, मनावर कोरलेला एक सुंदर सुविचार
शाळा म्हणजे प्रगतीची दोरी , शाळा म्हणजे आयुष्यभराची शिदोरी
शाळा म्हणजे अखंड ऊर्जेचा स्रोत ,शाळा म्हणजे सतत तेवणारी एक ज्योत
शाळा म्हणजे नव्या वह्यांचा वास आणि बिनधास्त खेळायला देणारा पीटीचा तास
शाळा म्हणजे शिक्षकांची भीती आणि निकालाविषयी असलेली धास्ती
शाळा म्हणजे मधल्यासुट्टीतील अंगतपंगत आणि स्नेहसंमेलनाची लगबग
शाळा म्हणजे वहीमध्ये जपून ठेवलेले पिंपळपान आणि राष्ट्रगीताच्या वेळीस ताठ होणारी मान.
आठवणीतली हि शाळा खरतर कधीच संपत नसते ती मनामनातून उरत असते....
इथला फळा ,रंग उडालेल्या भिंती,टेबल आणि लाकडी खुर्च्या ,रंगीबेरंगी खडू ,प्रत्येक तासाला जिच्या आवाजाची अत्यंत आतुरतेने वाट पाहायची ती शाळेची घंटा सारेच या आठवणींचे साक्षीदार असतात.
खरं सांगायचं तर आज माझ्याबरोबरचे सगळे जण , आम्ही चाळीशीच्या उंबरठ्यावर उभे आहोत.वयामुळे आणि अनुभवांमुळे एक प्रकारची प्रगल्भता साहजिकच आलेली आहे.जबाबदाऱ्या आहेत ,काळजी आहे , आमच्या मुलांकडून काही अपेक्षा आहेत,त्याचबरोबर त्यांचे निरागस बालपण टिकून राहावे याची मनस्वी धडपड देखील चालू आहे. त्यांच्यामध्ये आम्ही आमचे बालपण शोधण्याचा प्रयत्न करतोय.
काही जण करियरच्या यशस्वी शिखरावर आहेत कित्येक जण परिस्थितीवर मात करून नवीन सुरुवात करत आहेत.शाळेत मागच्या बाकावर बसून टिंगल टवाळी करणारी मस्तीखोर मुले आज कित्येक क्षेत्रात अग्रेसर आहेत. पुढच्या आयुष्याची स्वप्न आहेत पण कुठेतरी अजूनही आठवड्याभराच्या शाळेनंतर येणाऱ्या रविवारच्या सुट्टीची आठवण मन अस्वस्थ करत आहे .
आयुष्यातल्या या टप्प्यावर जेव्हा परत आपल्याला गतकाळातल्या बालपणाच्या शाळेच्या स्मृती पुन्हा एकदा जगण्याची संधी मिळते तेव्हा तो आनंद काय वर्णावा !!! २५ वर्षांनी शाळेमध्ये पाऊल टाकण्याचा आनंद आपल्याही नकळत आपल्या वयाचे ओझे उतरवतो आणि आपण पुन्हा एकदा शाळेचे विद्यार्थी होऊन जातो.
१९९४ साली उत्तीर्ण झालेल्या बॅचचा जेव्हा रौप्य महोत्सव करायचे ठरले तेव्हापासून ते अगदी काल हा समारंभ 'याची देही याची डोळा' माझ्या शिक्षकांसोबत तसेच माझ्या वर्ग मित्र आणि मैत्रिणींसोबत साजरा करण्याची संधी मला मिळाली हे मी खरोखर माझं भाग्य समजते.
अशा या समारंभाची तयारी साधारण तीन महिने आधीपासूनच सुरु झाली होती. एक ना दोन अनॆक कामे . कार्यक्रमाचे स्वरूप काय असावे , शिक्षकांना काय द्यावे , शाळेसाठी काय करता येईल या वर सगळ्यांची मते घेण्यात आली. काही विदयार्थ्यांनी पुढाकार घेऊन कामांची जबादारी घेतली. इतर विद्यार्थी वर्गाला निमंत्रणे गेली . मागील अनेक वर्षात शिक्षकांशी तुटलेला संपर्क पुन्हा प्रस्थापित करण्यात आला . एवढेच नाही तर आजच्या मोबाइल फोन , व्हाट्सअप आणि फेसबुक च्या जमान्यात जिथे सर्व काही ऑनलाईन करणे शक्य आहे अशा वेळीस शिक्षकांच्या घरी जाऊन निमंत्रण पत्रिका देण्याचे औचित्य साधण्यात आले. या पत्रिकांवर कार्यक्रमाला अनुरूप अशी स्वलिखित कविता छापण्यात आली. आमच्या लाडक्या बाईसाठी त्यांना उपयोगी पडतील अशा भेटवस्तू तसेच शिक्षक ,विद्यार्थीवर्गाला स्नेहाचे प्रतीक म्हणून तुळशीचे रोपे घेण्यात आली.
पूर्वतयारी झाली. आणि तो दिवस उजाडला १५ डिसेंबर २०१९ . आमच्या सर्वांच्या आयुष्यातला एक अविस्मरणीय दिवस !!!!!
शाळा सजली. प्रवेशद्वाराजवळची स्वामी विवेकानंदांची रांगोळी आमच्या मनामध्ये शाळेबद्दल असलेला सार्थ अभिमान जागृत करत होती. मंडप घातला गेला . फुलांची आरास , अत्तराचा घमघमाट, समई आणि दिव्याच्या मंद प्रकाश देणाऱ्या ज्योती , कार्यक्रम नीट पार पडावा म्हणून मदत करणारे असंख्य हात आणि याहून महत्वाचे म्हणजे सगळ्यांच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहणारा अमाप उत्साह . आजचा दिवस खासच होता . आमच्या सगळ्या बाई अगदी दिलेल्या वेळेवर आल्या. त्यांच्या डोळ्यात कौतुक होते. नमस्कारासाठी खाली वाकलो तेव्हा पाठीवरून फिरवलेल्या हातांध्ये एक माया होती. आशीर्वाद होते.
सरस्वतीपूजन, दीपप्रज्वलन, राष्ट्रगीत गायन , शिक्षकांचे मनोगत तसेच त्यांचा भेटवस्तू देऊन सत्कार , शाळेच्या आजी मुख्याध्यापकांकडून वृक्षारोपण , जुन्या संकलित फोटोचा स्लाईड शो , विद्यार्थ्यांचे मनोगत, वंदे मातरम स्नेहभोजन असा छान सुटसुटीत कार्यक्रम होता . रौप्य महोत्सवाचे औचित्य साधून शाळेच्या ग्रंथालयासाठी विविध विषयांवरची २५ चांगली पुस्तके देखील देण्यात आली.
शाळेचे ऋण फेडणे शक्यच नाही तरी देखील फुल ना फुलाची पाकळी म्हणून शाळेतल्या शिक्षकांना वापरता येईल असा लॉकर देण्यात आला. सामाजिक जाणीव ठेऊन शाळेतल्या १० गरजू विद्यार्थांच्या शिक्षणाच्या खर्चाची जबाबदारी सर्वानी उचलली.
वातावरणात एक प्रसन्नता होती.पारंपरिक वेशातले विद्यार्थी आणि त्यांच्या शिक्षकांनी या समारंभाला जणू एका लग्न सोहळ्याचे स्वरूप प्राप्त करून दिले होते. हॉलवर एक सहज नजर टाकली तेव्हा लक्षात आले काहींचे चेहरे जुन्या आठवणींनी उजळले होते, काहींचे डोळे पाणावले होते, काही कौतुकाने भारावले होते, काही जण जुन्या मित्र मैत्रिणींना नव्याने भेटत होते, काही जण अजूनही द्वाड मुलांसारखे मागच्या खुर्च्यावर बसून कार्यक्रमाची मजा घेत होते. काही जण कार्यक्रमाच्या नियोजनात व्यग्र होते.
वेगवेगळ्या दिशांना पांगलेली पाखरे आज या वास्तूमध्ये एकत्र जमली होती. जेव्हा मनोगत व्यक्त करण्याची वेळ आली तेव्हा कोणी अगदीच मोघम बोलले , कोणी अगदी भारावून गेले आणि कोणी आपल्या भावनांना कवितेचा सुंदर साज चढवला.
हा सोहळा मनाच्या कॅमेराने केव्हाच टिपला होता पण तरीदेखील सर्व शिक्षक तसे विदयार्थी वर्गाचा एक छान सामूहिक फोटोंचा कार्यक्रम झाला आणि आमच्या आयुष्यातला सुंदर दिवस त्या कॅमेरात कायमचा कैद करून ठेवला गेला.
निरोपासाठी हात हलले . पुन्हा भेटू आणि भेटत राहू अशी आश्वासने दिली गेली . दिवसभराचा मांडलेला पसारा परत नीट आवरला गेला . तृप्त मनाने आम्ही पुन्हा एकदा घराकडे निघालो. जाण्यापूर्वी मी एकदा शाळेच्या इमारतीकडे बघितले आणि मनोमन हात जोडले.
कुठेतरी वाचले होते, ' डोळ्यांच्या कडा ओल्या करणारी आठवणीतली शाळा कधीच संपत नसते . इथले वर्ग कधी सुटत नसतात . आपल्या भूमिका बदलतात. पाठीवरील दप्तराची जागा ऑफिसची बॅग घेते . शाळा मात्र नव्या चेहऱ्यांसोबत पुढील पिढी घडवण्यासाठी तिथेच उभी असते दीपस्तंभासारखी !!!!
शाळा म्हणजे आपल्या गतजन्मीचा पुण्यसंचय जो आपल्याला आयुष्यभर प्रेरणा देत राहतो , आपल्याला वाट दाखवत राहतो.
नेहमीसारखेच आई बाबा वाट बघत होते .नेहमीसारखेच सार काही ऐकायला ते उत्सुक होते . त्यांच्या डोळ्यात कौतुक होते . त्यांना सगळं सांगताना, फोटो आणि व्हिडीओ दाखवताना मी तो दिवस पुन्हा एकदा जगले.
घरी आले तेव्हा जुई तिच्या खोलीत अभ्यास करत होती. दहावीचं वर्ष , शाळेचा शेवटचा आठवडा असल्यामुळे तिच्या मनाची होत असलेली तगमग , बोर्डाच्या परीक्षेची तयारी, मैत्रिणींसोबत असलेले हवंहवंसं वाटणार सुंदर सुरक्षित जग आता कुठेतरी हरवून जाणार याची तिला वाटणारी खंत हे सगळं मी गेले काही दिवस बघत होते, एक आई या नात्यामधून.
आज पहिल्यांदाच एक मैत्रीण म्हणून या सगळ्या गोष्टींची जाणीव झाली.तिने माझ्याकडे हसून बघितलं. काही वर्षांपूर्वी माझा हात सोडून ती शाळेत गेली . 'शाळा खूप छान आहे पण तू तिथे का नसतेस ग' असं निरागसपणे विचारणारी , पहिल्यांदा मिळालेला मॉनिटरचा बिल्ला हाताच्या मुठीत घट्ट पकडून बसमधून उतरल्याबरोबर मला दाखवणारी माझी मुलगी आता सुखद आठवणींचा खजिना घेऊन काही दिवसातच शाळेच्या उबदार घरट्यातून उंच भरारी घेणार आहे पण माझ्याइतकीच तिच्या मनातली शाळा देखील कधीच संपणार नाही , तिची शाळा कधीच सुटणार नाही हे निश्चित !!!!!